महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात वाढ सुरुच आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल दरात लिटरमागे दहा पैशांनी वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे दर 81.83 रुपयांवर गेले आहेत. डिझेल दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
पेट्रोल दरात गेल्या महिनाभरापासून वाढ सुरु आहे. तर गत 26 दिवसांपासून डिझेल दरात वाढ करण्यात आलेली नाही. गुरुवारच्या दरवाढीनंतर मुंबईतील पेट्रोलचे लिटरचे दर 88.48 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता आणि चेन्नई येथील पेट्रोलचे दर अनुक्रमे 83.33 आणि 84.82 रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे देशभरातील दर स्थिर आहेत.
दिल्लीत डिझेल 73.56 रुपयांवर असून कोलकाता येथे हाच दर 77.06 रुपये, मुंबई येथे 80.11 रुपये तर चेन्नई येथे 78.86 रुपये इतका आहे. देशातील अन्य शहरांचा विचार केला तर नोएडा येथे पेट्रोलचे दर 82.17 रुपयांवर गेले असून रांची येथे 81.32 रुपये तर लखनौ येथे 82.07 रुपये दराने पेट्रोल विकले जात आहे.