COVID Drug Shortage : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनावरील औषधांचा तुटवडा ? रुग्‍णांच्या नातेवाइकांची धावपळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून ।। एकीकडे कोरोना रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोनावर प्रभावी असलेल्‍या ‘फॅविपिराविर’, ‘मोल्‍नुपिराविर’ आणि ‘पॅक्‍स्‍लोविड’ या विषाणुविरोधी (ॲँटिव्‍हायरल) गोळ्या-औषधांचा शहरात ठणठणाट आहे.

या गोळ्यांचा डोस कोरोनाचा संसर्ग झालेल्‍या रुग्‍णांना बरे करण्‍यासाठी देण्‍यात येत होता. मात्र, सध्‍या शहरासह पिंपरी-चिंचवडमधील औषधांच्‍या दुकानात कोणत्‍याही मात्रेच्‍या गोळ्या मिळत नसल्‍याने आणि त्‍याला इतर पर्यायी औषधेही उपलब्‍ध नसल्‍याने रुग्‍णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे.

कोरोनाच्‍या रुग्‍णांची संख्‍या गेल्‍या महिन्‍यापासून वाढत आहे. त्‍यामध्‍ये मुंबई व पुणे शहरे आघाडीवर आहेत. राज्‍यात जानेवारीपासून आतापर्यंत एक हजार ९१४ रुग्‍ण आढळले. त्‍यापैकी ६१३ रुग्‍ण आहेत. शुक्रवारी पुण्‍यात २६; तर पिंपरी-चिंचवडमध्‍ये पाच नवे रुग्‍ण आढळले. येथे दररोज सरासरी २५ नवे रुग्‍ण आढळत आहेत. त्‍यांच्‍यात सौम्‍य लक्षणे असली; तरी त्‍यांच्‍यासाठी ‘फॅविपिराविर’सह इतर गोळ्यांचा डोस डॉक्‍टरांकडून दिला जातो; तर मुलांसाठी पातळ औषध दिले जाते. मात्र, गेल्‍या महिन्‍यापासून रुग्‍णसंख्‍या वाढत असताना अद्याप गोळ्या उपलब्‍ध न झाल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

एकीकडे कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत असून काळजी करण्‍याचे कारण नसल्‍याचे आरोग्‍य विभाग सांगत आहे. मात्र, दुसरीकडे यावरील औषध उपलब्‍ध नसल्‍याकडे आरोग्‍य अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. शनिवारी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनात आरोग्‍य विभागातील अधिकाऱ्यांची कोरोनाबाबत बैठक घेतली. त्‍याला आरोग्‍य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्‍यासह विभागातील जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक व इतर आरोग्‍य अधिकारी उपस्थित होते. मात्र, उपस्थित आरोग्‍य अधिकाऱ्यांनी औषधाच्‍या तुटवड्याबाबत चकार शब्‍दही काढला नाही.

कंपन्‍यांकडून गोळ्यांची निर्मिती थांबली
याबाबत पुणे जिल्‍हा केमिस्‍ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर म्‍हणाले, ‘‘सध्‍या शहरात कोणत्‍याही मात्रेच्‍या (२००, ४००, ८०० एमजी) ‘फॅविपिराविर’च्‍या गोळ्या उपलब्‍ध नाहीत. कोरोनाकाळात या गोळ्या दिल्‍या जात होत्‍या. परंतु, साथ संपल्‍यानंतर डॉक्‍टरांनी या गोळ्या लिहून देण्‍याचे थांबवले. त्‍यामुळे अनेक कंपन्‍यांचा गोळ्यांचा साठा पडून राहिला व वाया गेला. त्‍यानंतर त्‍यांनी पूर्णपणे गोळ्यांची निर्मिती थांबवली असून सध्‍या तुटवडा आहे. या गोळ्यांची निर्मिती करायची झाल्‍यास त्‍याची बॅच साईज ही दोन लाख गोळ्या इतकी असल्‍याने सहसा कंपन्‍या निर्मिती करायला धजावत नाहीत.’’

राज्यात ५३ नवे रुग्ण आढळले
राज्यात शनिवारी कोरोनाचे ५३ नवे रुग्ण सापडले. त्यापैकी सर्वाधिक २४ रुग्ण मुंबईतील आहेत. पुणे शहरात ११, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन, तर ग्रामीण विभागात दोन रुग्‍ण आढळले. सध्या राज्यात ५७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बऱ्याच रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनाच्‍या एकूण २,१०६७ चाचण्या झाल्या असून, त्यापैकी एक हजार ९६७ रुग्ण बाधित आढळले. यापैकी १३६२ रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण ६९.२४ टक्के आहे. आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश रुग्ण सहव्याधींनी ग्रस्त होते. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार, टीबी आणि कर्करोग यांचा समावेश आहे.

काय आहे ‘फॅविपिराविर’?

मूळतः जपानमध्ये विकसित केलेले औषध भारतात कोरोनाच्या सौम्य ते मध्यम लक्षणांसाठी आपत्कालीन वापरासाठी वापरतात

हे औषध ‘आरएनए’ विषाणूंच्या वाढीला अडथळा आणते, त्यामुळे कोरोना विषाणू शरीरात वाढत नाही.

ग्लेनमार्क फार्माने ‘फॅबिफ्लू’ नावाने सर्वप्रथम बाजारात आणले, त्‍याशिवाय इतर फार्मा कंपन्‍यांनी फ्लूगार्ड, फॅविपिरा, फॅविविर आदी नावांनी उपलब्‍ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *