महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून ।। कधी रस्त्याच्या उलट्या दिशेने वाहन चालवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणे, कधी पदपथावर वाहन लावणे किंवा दुचाकीवर तीन जण बसणे…अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र किंवा माहिती सर्वसामान्य नागरिक थेट वाहतूक पोलिसांना पाठवू शकणार आहेत. त्यासाठी खास ‘अॅप’ तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
‘पीटीपी ट्रॅफिक कॉप’ असे ‘अॅप’चे नाव आहे. विधानभवनील कार्यक्रमाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आदी उपस्थित होते.
शहरात वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक पोलिसांकडील मर्यादित मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ‘अॅप’ विकसित करण्यात आले. नागरिकांनी त्याद्वारे तक्रार केल्यानंतर पडताळणी करून पोलिस कारवाई करतील. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय राहील. तक्रारकर्त्याचे नाव उघड न करण्याची दक्षता घेतली जाईल
दुचाकी चालवताना मोबाईलचा वापरणारे, फॅन्सी नंबरप्लेट लावणारे, काचांना काळी फिल्म लावणाऱ्यांचीही माहिती देता येईल. याशिवाय रस्त्यावरील अपघात, खड्डे, पाणी साचणे, झाड पडणे, वाहने बिघडणे, बेवारस वाहने याचाही माहिती नागरिक देऊ शकतील. संगणक अभियंते नितीन काणे व नितीन वैद्य यांनी हे ‘अॅप’ विकसित केले आहे.
पालखीसाठीही खास ‘ॲप’
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने तयार केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ या ‘ॲप’द्वारे पालखीचे ‘रिअल टाइम ट्रॅकिंग’ करणे शक्य होणार आहे. ‘पालखी ट्रॅकिंग ॲप’चेही यावेळी लोकार्पण करण्यात आले. त्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट वारी’ या संगणकीय उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले. या अंतर्गत सहभागी वारकऱ्यांची संख्या मोजण्यात येईल. त्यामुळे भविष्यात अचूक नियोजनासाठी याचा उपयोग होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘पीटीपी ट्रॅफिक कॉप’ या ‘अॅप’च्या माध्यमातून नागरिकांना आपल्यावरील जबाबदारीची भूमिका निभावण्याची संधी मिळेल. वाहतूक शिस्त राखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या अॅपचा वापर करावा.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त