Israel-Iran War : इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका ; भारताला अडकवण्याचा प्रयत्नात स्वत:च अडकला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जून ।। इस्रायलच्या हल्ल्यामुळे जगातील सर्वात मोठे गॅस क्षेत्र साऊथ पार्सचं नुकसान झालं असून उत्पादन पूर्णपणे बंद झालंय. त्यातून दररोज १.२ कोटी क्युबिक गॅसचं उत्पादन होतं. इस्रायलनंइराणच्या तेल आणि वायूच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्रायल आता इराणच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे जगात तेल आणि गॅसच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. जेपी मॉर्गन यांच्या म्हणण्यानुसार, जर ही लढाई दीर्घकाळ चालली तर कच्च्या तेलाची किंमत १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकते.

साऊथ पार्स गॅस फिल्ड ही इराणच्या दक्षिण बुशहर प्रांतात समुद्राखाली आहे. याचा विस्तार पर्शियन आखातापर्यंत आहे, जिथे इराण आणि कतारच्या सीमा मिळतात. कतारच्या भागाला नॉर्थ फिल्ड म्हणतात. हे जगाला भरपूर एलएनजी पुरवतं. इराणकडे असलेल्या गॅसपैकी निम्मा गॅस या ठिकाणी आहे. त्याचबरोबर इराणकडून तयार होणाऱ्या गॅसपैकी ६६ टक्के गॅसही येथून येतो. अमेरिका आणि रशियानंतर इराण हा जगातील तिसरा सर्वात मोठा गॅस उत्पादक देश आहे. हा देश दरवर्षी सुमारे २७५ बिलियन क्युबिक मीटर गॅसचं उत्पादन करतो, जो जगाच्या पुरवठ्याच्या ६.५ टक्के आहे.

इराणची स्थिती कशी?
आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे, इराणमध्ये तयार होणारा बहुतांश गॅस देशात वापरला जातो. इराण या गॅसचा वापर आपल्या घरांमध्ये, कारखाने चालवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी करतो. याउलट, कतार दरवर्षी त्याच क्षेत्रातून ७७ मिलियन टन एलएनजी निर्यात करतो. शेल आणि एक्सॉनमोबिल सारख्या मोठ्या कंपन्या यात त्यांना मदत करतात. या हल्ल्यामुळे केवळ इराणच्या ऊर्जा क्षेत्राला धोका नाही, तर भविष्यात अधिक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले होऊ शकतात, असा हा इशारा आहे.

इराणची एनर्जी सिस्टम आधीच खराब आहे. देशात विजेचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर आणि उद्योगांवर होत आहे. इराण चेंबर ऑफ कॉमर्सच्या म्हणण्यानुसार, वीज कपातीमुळे दररोज सुमारे २५० मिलियन डॉलर्सचं नुकसान होत आहे. निर्बंध, कालबाह्य उपकरणं आणि गुंतवणुकीचा अभाव यामुळे हे क्षेत्र असुरक्षित बनलंय. हा अडथळा दीर्घकाळ कायम राहिल्यास अर्थव्यवस्था बिघडू शकते आणि लोकांमध्ये संताप वाढू शकतो.


चीनवरही परिणाम

देशातील औद्योगिक क्षेत्राचा सर्वाधिक महसूल तेल उद्योगातून मिळतो. इराणच्या तेल निर्यातीत चीनचा वाटा ९० टक्क्यांहून अधिक आहे. पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घातले असले तरी इराण आणि चीन यांच्यातील तेल व्यापारावर कोणताही परिणाम झालेला नाही. पण इराणच्या तेल तळांवर हल्ला झाल्यास ही परिस्थिती बदलू शकते. यामुळे चीनला होणारा तेलपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. तसं झाल्यास चीनच्या अर्थव्यवस्थेचंही नुकसान होऊ शकतं. मार्च महिन्यात चीननं इराणकडून दररोज १८ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात केली होती. भारताला रेअर अर्थ मॅग्नेटचा पुरवठा थांबवणारा चीन आता स्वत:च अडकू शकतो.

इराणच्या अर्थव्यवस्थेवर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड आणि इस्लामिक संघटनांचं वर्चस्व आहे. ते कर भरत नाहीत आणि कोणतेही हिशोब देत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार इराण इस्रायलशी जास्त काळ युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही. इराणची लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे तर इस्रायलची लोकसंख्या ९५ लाख आहे. इराणचं प्रति व्यक्ती उत्पन्न ५,३१० डॉलर आहे तर इस्रायलचं ५३.३७ हजार डॉलर आहे. हे स्पष्ट आहे की इस्रायल दीर्घकाळ युद्ध लढू शकतो, परंतु इराणसाठी असं करणं सोपं नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *