महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जून ।। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात धीरू भाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. “पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचे काम करून धीरू भाई अंबानी कोट्यधीश झाले”, असं अजित पवार म्हणाले. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या ‘सोडून’ या शब्दाचा ‘चोरून’ असा विपर्यास करत वक्तव्य व्हायरल झाले. यावर पवार यांनी मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मीडियाने ‘ध’चा ‘म’ करून माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. जर मी चुकीचा शब्द वापरला असेल, तर मी राजकारण सोडेन,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांनी तरुणांना प्रेरणा देताना म्हटलं की, “कोणतेही काम कमी लेखू नये. पेट्रोल पंपावर काम करूनही धीरू भाई अंबानी यांनी मोठी स्वप्ने साकारली. तशीच तयारी तरुणांमध्ये हवी..! कामातूनच सोने निर्माण करता येते,” असे ते म्हणाले. पण त्यांनी पेट्रोल पंप उभारण्याबाबत सहकाराला प्राधान्य दिल्याचे सांगितले. “मी पेट्रोल पंप उभारला असता, तर गोरगरीब मुलांना रोजगार दिला असता. पण मला सहकार टिकवायचा होता,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका करत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला, तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी याला प्रत्युत्तर दिले. या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.