महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जून ।। आषाढी-कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरीत (Pandharpur) दाखल होतात. कार्तिकीनंतर वारकऱ्यांना वेध लागलेले असतात ते आषाढी वारीचे. पावसाळ्याला सुरुवात होताच, वारीची लगबग सुरू होते आणि शेकडो दिंड्यांतून हजारो वारकऱ्यांच्या पाऊले पंढरीच्या दिशेने पडतात. लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूरमध्ये जमतो. त्यामुळे, शासन आणि प्रशासनही नागरिकांच्या, भाविकांच्या सेवेसाठी सज्ज असते. सोलापूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यावरही मोठी जबाबदारी असते. त्याचप्रमाणे सोलापूर रेल्वे विभाग आणि एसटी महामंडळाकडेही प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्या सोडण्याचं महत्त्वाचं काम असतं. पंढरीच्या वारासाठी एसटी महामंडळासह रेल्वेकडूनही जादा गाड्या सोडत भाविकांची सोय केली जाते. आता, मध्य रेल्वेकडून पंढरीच्या वारीसाठी 80 पेक्षा अधिक विशेष रेल्वे (Railway) गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे.
आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी 80 पेक्षा अधिक विशेष गाड्यांची सुविधा करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्हे आणि राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेची ही सेवा असणार आहे. पुणे,नागपूर,अमरावती,कलबुर्गी,भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन ह्या रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे, वारीसाठी, आषाढीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची सोय होईल.
कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांसाठीही ट्रेन
पुणे-मिरज, नागपूर-मिरज, न्यू अमरावती-पंढरपूर विशेष, खामगाव-पंढरपूर विशेष, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष, मिरज-कलबुर्गी, कोल्हापूर-कुर्डूवाडी अशा 80 पेक्षा अधिक विशेष फेऱ्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितलं. विशेष म्हणजे, कर्नाटक राज्यातून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी देखील विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला असून त्याचा शासन आदेशही निघाला आहे.
मानाच्या पालख्यांचे प्रस्थान
पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. आता, या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, अनुक्रमे 18 आणि 19 जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे.
यंदा एआयच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण
आषाढी वारीच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी या एआय तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) वापर केला जाणार आहे. चैत्री एकादशी दिवशी याची चाचणी देखील पंढरपूर येथील बसस्थानक येथून घेण्यात आली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाकाठी पंढरपुरात जवळपास दोन ते अडीच कोटी भाविक येत असतात. आषाढी यात्राकाळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी प्रशासनाकडून एक महिना अगोदरच तयारी केली जाते.