महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जून ।। कोल्हापूर शहरात उघडझाप असली, तरी धरणक्षेत्रात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने नृसिंहवाडीतील श्री. दत्त मंदिरासमोर दोन फूट पाणी आले आहे. आज भाविकांनी मंदिरासमोरील पाण्यातूनच दर्शन घेतले. दरम्यान, पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री २८ फूट चार इंचावर पोहोचली. पावसाचा जोर वाढल्यास पातळीत वाढ होऊन केव्हाही पाणी पात्राबाहेर पडण्याची स्थिती आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात २३.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर १९ बंधारे पाण्याखाली गेले. त्याचबरोबर हवामान खात्याने उद्या, रविवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविला आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये कृष्णा नदी पात्रात तब्बल १४ फूट पाणी पातळी वाढ झाली. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची मोटर व चारा काढण्यासाठी तारांबळ उडाली. दत्त देवस्थान मंदिर प्रशासनानेसुद्धा आपले मंडप व मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले. आज दिवसभरामध्ये दोन ते तीन फूट पाणी पातळी वाढ झाली असून, पोर्चवर अंदाजे अडीच फूट पाणी आले आहे. यामध्ये आणखी दोन फुटांनी पाणी वाढल्यास मंदिरात पाण्याचा प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे या हंगामातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे.
शहरात आज पावसाची उघडझाप सुरू राहीली. परंतु, धरणक्षेत्र व नदीक्षेत्रात पावसाचा जोर राहिला. कालच्या तुलनेत आज पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी काही इंचांनी वाढली, तर सायंकाळनंतर त्यामध्ये घट ही होत गेली. रात्री ही पातळी २८ फूट चार इंच इतकी राहिली.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, कुंभी नदीवरील सांगशी, कासारी नदीवरील ठाणे-आळवे, बरकी, यवलूज, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, सरकारी कोगे, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकुड, सिद्धनेर्ली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
विविध ठिकाणी नुकसान
जोरदार पावसामुळे चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील रमेश गोविंद नाईक यांच्या घराची भिंत कोसळून अंदाजे ५० हजार रुपये, राधानगरी तालुक्यातील तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील जिवबा गोपाळ पाटील यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे २० हजार व म्हसवे (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय भोसले यांच्या घराची भिंत पडून अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.