महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी या विस्तारित मार्गांना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या दोन्ही मार्गांसाठी ३ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) देण्यात आली आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गिकांचं विस्तार
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (पर्पल लाइन) मार्गिकेचा विस्तार अनुक्रमे निगडी व कात्रजपर्यंत करण्यासाठी यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. वनाझ ते रामवाडी दरम्यानच्या मार्गिकांचा प्रस्ताव एक वर्षाहून अधिक काळ केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विस्तारित मार्गांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पुढील काही दिवसांत या दोन्ही मार्गिकांचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
पुणेकरांसाठी मेट्रोची सुविधा
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर सध्या मेट्रोची सेवा केवळ रामवाडीपर्यंत असून त्यापुढे शहर वाघोलीपर्यंत विस्तारले आहे. त्यामुळे या परिसरातून येणाऱ्या नागरिकांना रामवाडीच्या पुढे रिक्षा किंवा खासगी कॅबवर अवलंबून राहावे लागत होते. रामवाडीचा विस्तार लवकरात लवकर वाघोलीपर्यंत करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
मेट्रोचे जाळे ८० किमीपर्यंत विस्तारणार
अखेर, प्रवाशांच्या या मागणीला यश मिळाले आहे. त्याशिवाय, मुंबई किंवा सातारा येथून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अथवा खासगी प्रवासी वाहनांनी येणाऱ्या नागरिकांना चांदणी चौकापासून मेट्रो मिळाली, तर त्यांना शहराच्या सर्व भागांत ये-जा करणे शक्य होणार आहे. त्यासाठी या विस्तारित मार्गाची गरज व्यक्त केली जात होती. या दोन्ही मार्गांना मान्यता दिली गेल्याने पुणे शहरातील एकूण मेट्रोचे जाळे ८० किमीपर्यंत विस्तारणार आहे.