महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर तेंडुलकर-अँडरस ट्रॉफी खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला हेडिंग्लेमध्ये पाचव्या दिवसाच्या शेवटच्या दिवशी पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे इंग्लंडने ५ विकेट्सने मिळवलेल्या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या सामन्यात भारताकडून ५ शतके झाली होती. पण त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी इतिहासात ५ शतकांनंतरही पराभूत होणारा भारत पहिलाच संघ ठरला. अशातच आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला असून एका खेळाडूला पुन्हा मायदेशी परतावे लागणार आहे.
युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला पहिल्या कसोटीच्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघात निवडण्यात आलं होतं. त्यावेळी बीसीसीआयने सांगितले होते की त्याचा पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याआधी तो इंग्लंड अ संघाविरुद्ध झालेल्या प्रथम श्रेणी मालिकेत भारतीय अ संघाचा भाग होता.
पण त्याला नंतर इंग्लंडमध्येच पहिल्या कसोटीसाठी थांबवण्यात आलं होतं. पण आता टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार हर्षित राणाला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघातून मुक्त करण्यात आले आहे.
भारताचा संघ दुसऱ्या कसोटीसाठी बुधवारी (२५ जून) लीड्समधून बर्मिंगहॅमला गेला आहे. पण त्यावेळी हर्षित राणा संघातील इतर खेळाडूंसोबत बर्मिंगहॅमला गेलेला नाही. भारतीय संघ आता दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी सराव करण्यास सुरुवात करेल. दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमला २ जुलैपासून सुरू होणार आहे.
तथापि, पहिल्या कसोटीत हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. त्याला पहिल्या कसोटीसाठी केवळ खबरदारी म्हणून संघात स्थान देण्यात आले होत, याबाबत पहिल्या कसोटीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले होते.