Iran News : गद्दारांना माफी नाही ! इराणने इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्या 700 जणांना केलं अटक, तिघांना फाशी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। इराणने इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 700 हून अधिक लोकांना अटक केली आहे. याशिवाय बुधवारी सकाळी तीन जणांना फाशी देण्यात आली. ही कारवाई इराण आणि इस्रायल मधील 12 दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामाच्या दुसऱ्या दिवशी झाली आहे.

इराणच्या न्यायपालिकेशी संलग्न मिझान न्यूज वृत्तसंस्थेनुसार, फाशी देण्यात आलेल्या तीन व्यक्तींवर इस्रायलच्या मोसादसाठी हेरगिरी आणि हत्येसाठी उपकरणांची तस्करी केल्याचा आरोप होता. इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल, असं फाशी देण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांनी इराणमधील एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या हत्येचा कट रचल्याचा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला आहे.

इराणच्या फार्स न्यूज वृत्तसंस्थेनुसार, 13 जूनपासून सुरू झालेल्या इराण-इस्रायल संघर्षादरम्यान ही अटक करण्यात आली. केरमानशाह, इस्फहान, खुजिस्तान, फार्स आणि लोरेस्तान प्रांतांमध्ये सर्वाधिक अटके झाल्या. अटक केलेल्यांवर इस्रायलसाठी ड्रोन चालवणे, हातबॉम्ब बनवणे, संवेदनशील लष्करी ठिकाणांचे चित्रीकरण करणे आणि ही माहिती इस्रायलली गुप्तचरांना पुरवण्याचे आरोप आहेत. याशिवाय अटके दरम्यान 1 हजारहून अधिक ड्रोन, स्फोटके, डेटोनेटर, संचार उपकरणे आणि काही अँटी-टँक क्षेपणास्त्रे जप्त करण्यात आली.

दरम्यान, 13 जून रोजी इस्रायलने इराणवर ‘रायझिंग लायन’ ऑपरेशन अंतर्गत हल्ले सुरू केले होते. या 12 दिवसांच्या संघर्षात इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील अण्वस्त्र सुविधांवर अमेरिकेनेही हवाई हल्ले केले. 24 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला. मात्र युद्धविरामाच्या दुसऱ्याच दिवशी इराणने ही आक्रमक कारवाई केल्याने युद्धविरामाच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

इराणने यापूर्वीही इस्रायलली गुप्तचरांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. 16 जून रोजी माजिद मोसाय्येबी नावाच्या व्यक्तीला इस्फहानमध्ये फाशी देण्यात आली होती, तर 23 जून रोजी मोहम्मद-अमिन मेहदवी शायेस्तेह याला हेरगिरीच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. इराणच्या अधिकाऱ्यांनी इस्रायलच्या हल्ल्यांनंतर देशात गुप्तचरांचे जाळे सक्रिय झाल्याचा दावा केला होता. यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *