महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दुचाकी वाहनधारकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. काही माध्यमांमध्ये 15 जुलैपासून दुचाकी वाहनांना टोल लागणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यावर गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दुचाकी वाहनांवर टोल लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकार विचारात नाही. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना टोलमधून सूट मिळत राहील, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
15 जुलैपासून दुचाकी वाहनांना टोल लागेल, अशी चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होती. या चर्चांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही वाहतूक संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आणि सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. यावर नितीन गडकरी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, सरकार दुचाकी वाहनांवर टोल लावण्याचा विचार करत नाही.
नितीन गडकरी म्हणाले, “काही मीडिया संस्था दुचाकी वाहनांवर टोल लावण्यासंबंधी चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. याबद्दल कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून दिलेली सूट कायम राहील. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, अशा बातम्या पसरवू नयेत,” असं आवाहन गडकरी यांनी केलं आहे.