महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे ही समस्या भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. तर दुसरीकडे रिंग रोडशिवाय पुणे आणि पिंपरी – चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटणं अशक्य आहे. या रिंग रोड प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, त्याला समांतर लोहमार्ग बांधण्याची गरज आहे, अशी माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लोहमार्गाची गरज
प्रस्तावित लोहमार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, रांजणगाव मार्गे उरुळी कांचनपर्यंत विकसित करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. हा मार्ग पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करेल, तसंच प्रवासी आणि मालवाहतुकीला गती देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून हा मार्ग लवकर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रिंग रोडसाठी भूसंपादन
पुणे रिंग रोड प्रकल्प १३६.८ किमी लांबीचा आहे. हा रिंग रोड खेड, मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांमधील ४४ गावांना जोडणार आहे. यामुळे बाह्य वाहनांना शहरात प्रवेश न करताच बाहेरून प्रवास करता येईल. या रिंग रोडसाठीचं भूसंपादन ९६ टक्के पूर्ण झालं असून, लवकरच भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.
रिंग रोड आणि लोहमार्गामुळे नागरिकांना मोठा फायदा
या रिंग रोड आणि लोहमार्गामुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारेल, प्रदूषण कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणेकरांचा प्रवास सूकर होणार असून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प पुण्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असल्याचं अजित पवार यांनी याबाबत सांगितलं.
पुणे मेट्रोचं जाळं ८० किमीपर्यंत
दरम्यान, रिंग रोडशिवाय पुण्यात मेट्रोसाठीही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी हे विस्तारित मार्ग सुरू होणार आहेत. या मार्गामुळे शहरातील मेट्रोचं जाळं आता ८० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. या दोन्ही मार्गांचं पुढील चार वर्षात काम पूर्ण करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे देण्यात आली आहे. या मार्गांसाठी ३ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
