IND vs ENG: इंग्लंडच्या ताफ्यात तो परत आला.. : दुसऱ्या मॅचसाठी संघ जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आता इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघात मॅचविनर खेळाडूला स्थान दिले आहे. तब्बल चार वर्षांनी या मॅचविनर खेळाडूला इंग्लंडने आपल्या संघात संधी दिली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ अधिक बलशाली होणार असल्याचे दिसत आहे.

पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर पाच विकेट्स राखत मात केली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्यांच्या संघात बदल होणार नाही, असे वाटत होते. कारण एखादा संघ जिंकला की, त्यामध्ये बदल न करता तोच संघ पुढील सामन्यात खेळवला जातो, पण इंग्लंडने मात्र तसे केलेले नाही. कारण इंग्लंडने आपल्या संघात बदल करत असताना चार वर्षांपूर्वी संघात असलेल्या मॅचविनर खेळाडूला पुन्हा संघात संधी दिली आहे.

इंग्लंडचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी कसा आहे संघ, पाहा..
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जो रूट, बेन डकेट, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, क्रेग ओव्हरटन, ऑली पोप, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

इंग्लंडच्या संघात आता वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे. गेली चार वर्षे तो इंग्लंडच्या संघात नव्हता. गेल्या काही दिवसांपासून तर तो दुखापतीमुळे त्रस्त होता, पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे आणि तो कौंटी क्रिकेटमधला सामनाही खेळला आहे. त्यामुळे आर्चरने आपला फिटनेसही या सामन्यात दाखवला आहे. त्यामुळे आर्चरला आता भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी अधिक बळकट झाल्याचे समोर आले आहे.

जोफ्रा आर्चर संघात आल्यामुळे आता भारताच्या फलंदाजांची चांगलीच कसोटी लागणार आहे. कारण आर्चर हा भेदक वेगवान मारा करतो. आतापर्यंत त्याने संघाला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे आर्चर आता भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कसे कमबॅक करतो, याकडे तमाम क्रिकेच विश्वाचे लक्ष नक्कीच लागलेले असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *