Donald Trump: शस्त्रविरामासाठी भारत-पाकिस्तानला धमकावल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की, त्यांनी दोन्ही देशांसोबतचे “सर्व व्यापार करार रद्द” करण्याची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला.

“आम्ही उत्तम काम केले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कदाचित अणुयुद्ध झाले असते. ते आम्ही थांबवले. मला माहित नाही की कधी असा राष्ट्राध्यक्ष झाला आहे की नाही, ज्याने इतके मोठे काम केले आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारत आणि पाकिस्तानला, जर त्यांनी युद्ध थांबवले नाही, तर व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा इशारा देण्याचे निर्देश दिले होते.

“मी हॉवर्ड लुटनिक (ट्रेझरी सेक्रेटरी) यांना फोन करून भारत आणि पाकिस्तानला सांगण्यास सांगितले की, जर त्यांनी युद्ध सुरू ठेवले, तर ट्रम्प दोन्ही देशांसोबतचे सर्व व्यापार करार रद्द करतील. यानंतर दोन्ही देशांनी आम्हाला फोन केला व शस्त्रविराम झाला,” असे ट्रम्प म्हणाले.

याबाबत पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, “दोन्ही देशांनी मला फोन केला आणि म्हणाले, आम्ही काय करू? मी म्हणालो, हे पाहा, तुम्हाला अमेरिकेशी व्यापार करायचा आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही एकमेकांविरोधात अण्वस्त्रे वापरू इच्छिता. आम्ही हे होऊ देणार नाही. यानंतर दोन्ही देश शस्त्रविरामास सहमत झाले.”

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी रवांडा आणि काँगो यांच्यातील शांतता करारानंतर पुन्हा दावा केला की, त्यांनीच भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केली होती. ते म्हणाले की, “काही महिन्यांतच आपण भारत आणि पाकिस्तान, इस्रायल आणि इराण, काँगो आणि रवांडा व इतर काही देशांमध्ये शांतता प्रस्थापित केली आहे.”

दरम्यान, भारताने सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे नाकारले असून, पाकिस्तानबरोबरचा शस्त्रविराम दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यातील थेट संवादानंतर झाल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्याशी अलिकडेच झालेल्या फोनवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते की, भारत तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी कधीही स्वीकारणार नाही.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. याला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे हल्ले परतावून लावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *