महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महिला व बालविकास विभाग प्राप्तिकर विभागाशी करार करणार आहे. अपात्र महिलांच्या शोधासाठी हा करार करणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. जर उत्पन्न जास्त असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळमार नाही. परंतु तपासणीदरम्यान, आता अनेक लाडक्या बहिणींना निकष डावलून योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय घेतला निर्णय?
लाडक्या बहिणींच्या माहितीची गोपनियता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा सांमजस्य करार केला जाणार आहे.याबाबत प्राप्तिकर विभागाकडे याआधीच अहवाल मागितला आहे. परंतु त्याची प्रतिक्षा अजूनही कायमच आहे. याबाबत प्राथमिक बोलणी सुरु आहे. लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल, असं सांगण्यात येत आहे.
प्राप्तिकर विभाग करणार पडताळणी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरु आहे. या योजनेत ज्यांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रोसेस सुरु झाली आहे.दरम्यान, अनेक महिलांचे अर्जदेखील बाद करण्यात आले आहेत.
जूनच्या हप्त्याची प्रतिक्षा
लाडक्या बहिणींना आता जूनच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कदाचित आता पुढच्या महिन्यातच महिलांच्या खात्यात जूनचा हप्ता जमा होईल.