Char Dham Yatra – चार धाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित, धोक्याची घंटा वाजताच प्रशासन झालं अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याचा समारोप झाल्यानंतर भाविकांना चार धाम यात्रेचे वेध लागले. एप्रिल-मे महिन्यामध्ये चार धाम यात्रा सुरू होते आणि दिवाळीच्या आसपास मंदिरे बंद होतात. सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात ही या यात्रा सुरू झाली. मात्र ही यात्रा 24 तासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने चार धाम यात्रा पुढील 24 तासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेकरुंना हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर येथे थांबविण्याच्या सूचना पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली.

हवामान विभागाने पुढील 24 तासात पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडण्याचा आणि भूस्खलन होण्याचा धोका आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगत प्रशासनाने चार धाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 24 तासानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.

उत्तरकाशीत ढगफुटी, 8-9 कामगार बेपत्ता

दरम्यान, उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली आहे. यामुळे बडकोट-यमुनोत्री मार्गावरील सिलाई बंद भागात बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलचे नुकसान झाले असून तिथे काम करणारे 8 ते 9 कामगार बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *