महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुलै ।। जगातील दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4 टक्के म्हणजेच 9,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत आहे.
2023 नंतरची सर्वात मोठी कर्मचारी कपात
ही कर्मचारी कपात 2023 नंतरची सर्वात मोठी कपात मानली जात आहे. अद्याप कंपनीने यामागचं नेमकं कारण जाहीर केलं नाही. मात्र, अनेक तज्ज्ञांच्या मते, ही कपात कंपनीच्या बदलांचा भाग आहे.
एआयचा वापर वाढल्यामुळे धोका?
अहवालांनुसार, मायक्रोसॉफ्ट सध्या कामात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. कंपनीचे CEO सत्य नडेला यांनी यावर्षीच्या सुरुवातीस सांगितलं होतं की, सध्याच्या घडीला 20-30 टक्के कोड AI तयार करत आहे.
AI आधारित कोडिंग असिस्टंट्समुळे कोडिंग आणि डेव्हलपमेंटशी संबंधित कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकतात. काही विभागांमध्ये तर AI चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
कर्मचारी कपातीचं प्रमाण वाढतंय
मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 2.28 लाख कर्मचारी काम करत आहेत. पण कपातीचं प्रमाण दरवर्षी वाढत चाललं आहे.
मे 2025 मध्ये 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं.
जूनमध्ये 300 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली.
जानेवारीत 1% कर्मचारी ‘परफॉर्मन्स’च्या आधारावर कमी करण्यात आले.
2023 मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते.
सर्वात मोठी कपात 2014 मध्ये झाली होती, तेव्हा 18,000 कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून कमी केलं होतं. त्यावेळी मायक्रोसॉफ्टने Nokia चा डिव्हाइसेस आणि सर्व्हिस बिझनेस विकत घेतला होता.
कंपनीचं अधिकृत म्हणणं काय?
एएफपीच्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, कंपनी आपले संघटनात्मक बदल नियमितपणे करते. त्यांनी स्पष्ट केलं की, “ कंपनी चांगली चालली असतानाही आम्ही आमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार कर्मचारी कपात केली आहे”
मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत AI चा वाढता प्रभाव आणि कार्यक्षमता सुधारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कपात केली जात आहे. याचा थेट परिणाम हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर होत आहे. पुढील काळात ही प्रक्रिया अजून वेग घेईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.