महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। ‘‘महिला अत्याचाराच्या घटना घडतात, त्याचा खटला चालतो. पण महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटनांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावण्याचा विचार सुरू आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. विधी व न्याय विभागाला कायदेशीर बाबी तपासण्यास सांगितले आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित गुरुजन गौरव समारंभात पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर माजी महापौर अंकुश काकडे, दीपक मानकर, दत्ता धनकवडे, अप्पा रेणुसे, विजय जगताप, अभय मांढरे, मोनिका मोहोळ, रमेश कोंडे आदी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. पुढील काळात इलेक्ट्रॉनिक विषय फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी संरक्षण क्षेत्रात आवर्जून जावे आणि स्वतःसह देशाची प्रगती करावी. जैव तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, रि-सायकलिंग या विषयांना आगामी काळात मोठे भविष्य असेल.’’
शास्त्रीय नृत्यासाठी पुण्यात चांगले काम होत आहे, त्यासाठी विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून भाटे म्हणाल्या, ‘‘शास्त्रीय नृत्य आणि शास्त्री संगीत ही भारताला लाभलेली मोठी परंपरा आहे. त्याचे योग्यरीतीने दस्तावेजीकरण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.’’
कुवळेकर म्हणाले, ‘‘उद्याचे भवितव्य शिक्षण क्षेत्रावर आणि शिक्षण क्षेत्रातील संस्कारांवर अवलंबून आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन केले पाहिजे, याची जाणीव समाजमनात झाली पाहिजे. अजून खूप शिकायचे आहे, याची जाणीव मला सतत असते. मी स्वतःला पत्रकारितेत प्रशिक्षणार्थी पत्रकारच समजतो. एकेका क्षेत्रासाठी आयुष्य वाहून दिलेली माणसे असतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप असते.’’ या वेळी खेळाडू अलोक तोडकर याला ५१ हजारांचा धनादेश देण्यात आला. अप्पा रेणुसे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. युवराज रेणुसे यांनी आभार मानले.
‘परदेशी गेलेले विद्यार्थी परतत नाहीत’
अरुण फिरोदिया हे परदेशातील नामवंत संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतात परत आले आणि त्यांनी आपले ज्ञान, कौशल्य आणि दूरदृष्टी देशाच्या प्रगतीसाठी वाहून दिली. मात्र सध्याच्या काळात अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेतात, यशही मिळवतात. ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’ यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून शासन त्यांच्या शिक्षणासाठी मदत करते. आमची अपेक्षा होती की, शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती दिल्यानंतर त्यांनी भारतात यावे, काम करावे; परंतु परदेशात गेलेले ९० टक्के विद्यार्थी भारतात परत येत नाहीत. नोकरी, व्यवसाय करून तेथेच स्थायिक होतात, ही बाब चिंताजनक आहे, असे पवार म्हणाले. फिरोदिया यांनी नवकल्पनांना चालना दिली, असेही त्यांनी सांगितले.