महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। अवघे गरजे पंढरपूर, चालला हरिनामाचा नामाचा गजर.. असेच काहीस चित्र सध्या पंढरीत आहे. आज आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले आणि त्यांची पत्नी कल्पना उगले यांना महापूजेचा मान मिळाला. उगले दाम्पत्य गेल्या १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. नाशिकला सलग दुसऱ्या वर्षी मानाचे वारकऱ्याचा मान मिळाला आहे.
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न झाली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले यांना मानाचे वारकरी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला. पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…#LIVE | देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा@Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Pandhapur https://t.co/SPGcXKQC2r
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 5, 2025
अनेक वर्षापासून वारी सुरू आहे. इंग्रज काळ असो वा मोगल काळ यामध्ये वारी थांबली नाही. संताचा संदेश वारीत अनुभवायला मिळतो. दुसऱ्यात ईश्वर कुठेच पहिला जात नाही पण वारीत ते होते. भागवत पताका वारी माध्यमातून सुरूच राहिला पाहिजे. माझा महाराष्ट्र प्रगतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्वाची आहे. विठल रुख्मिणी आराध्य दैवत आहे. पांडुरंगचा आशीर्वाद मिळत राहो. पांडुरंग मनातला ओळखणारा आहे, राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा अशी प्रार्थना करतो.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र
पंढरपुरात भक्तीचा महापूर
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे वीस लाखाहून अधिक भाविकांची पंढरपुरात मांदियाळी झाली आहे. पंढरी नगरीत सर्वत्र विठू नामाचा जयघोष सुरू आहे. मठ आणि मंदिरांमध्ये टाळ मृदुंगाचा गजर असून अवघी पंढरी नगरी विठू नामाच्या भक्तीरसात नाहून निघाली आहे. आज पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झाले. चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचे व कळस दर्शन घेऊन वारी पूर्ण केली. दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत सुमारे ७५ हजाराहून अधिक भाविक उभे आहेत.
यावर्षी मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने मंदिर परिसरात एकेरी वाहतूक केली आहे. त्यामुळे संत नामदेव पायरी चौफाळा विठ्ठल मंदिर या भागात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवता आले आहे.विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापौर लोटला आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले आणि कल्पना उगले यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित येतात.