महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘परख’ ही राष्ट्रीय मूल्यांकन संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणात देशातील विविध राज्यांनी सहभाग घेतला. सर्व राज्यांनी केलेल्या कामगिरीचा विचार करता पंजाब व केरळ पहिल्या क्रमांकावर असून, महाराष्ट्र देशात आठव्या स्थानावर आहे.
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावर असून, इयत्ता 6 वी व 9 वीचा विचार करता महाराष्ट्र अनुक्रमे सातव्या व दहाव्या क्रमांकावर आहे. या सर्वेक्षणातून कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वाधिक हुशार असल्याचे आढळून आले आहे. (Latest Pune News)
‘परख’ संस्थेच्या माध्यमातून 4 डिसेंबर 2024 रोजी देशपातळीवर राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये इयत्ता तिसरी, सहावी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले गेले. महाराष्ट्रातील 4 हजार 314 शाळा 13 हजार 930 शिक्षक आणि एक लाख 23 हजार 69 विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीमधील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांसाठीचे मूल्यांकन करण्यात आले.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 व ‘परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024’ यांची तुलना करता इयत्ता नववी गणित विषय वगळता सरासरी संपादणूक यामध्ये तीन टक्के वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
या सर्वेक्षणात राज्य शासनाच्या शाळांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्तम कामगिरी केली असली, तरी एकूणच माध्यमिक स्तरावर अजूनही सुधारणा आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.
सर्वेक्षण अहवालानुसार, देशपातळीवर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.इयत्ता तिसरीचा विचार करता लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर व पालघर यांची संपादणूक कमी आहे.
इयत्ता सहावीमध्ये वर्धा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, गडचिरोली, रायगड हे जिल्हे मागे आहेत. तर इयत्ता नववीचा विचार करता अकोला, नंदुरबार, परभणी, गडचिरोली आणि मुंबई उपनगर हे जिल्हे मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.