महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती घसरणीचा कल सुरु आहे. काही दिवसांआधी सोन्याच्या किमतींनी उच्चांकी मजल मारली होती ज्यामुळे ऐन सणासुदीत सोने खरेदी विसरायची की काय असा प्रश्न उपस्थित होत होता. पण आता अलीकडेच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तीव्र चढउतार दिसून येत आहेत. अमेरिकेने टॅरिफची मुदत वाढवली आणि त्यासंबंधीच्या ताज्या अपडेट्सचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे.
भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत कमकुवतपणा दिसून येत आहे. जागतिक बाजारातही डॉलर निर्देशांकाच्या मजबूतीमुळे सोन्याचे भाव एक आठवड्याच्या नीचांकी पातळीवर घसरले आहेत. स्थिर डॉलर आणि अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ झाली, ज्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला असून बुधवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचे दर घसरले.
त्याचवेळी, मंगळवारी अमेरिकन डॉलर दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर स्थिर राहिला, तर 10 वर्षांच्या अमेरिकन ट्रेझरी नोट्सवरील उत्पन्न तीन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
सोने आणि चांदीचा आजचा भाव काय
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. MCX वर ऑगस्ट सोन्याचा वायदा 260 रुपयांच्या रुपयांनी घसरला आणि 96,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे, तर सोन्याचा सर्वकालीन उच्चांक 1,01,078 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, सोन्याप्रमाणे सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या चांदीच्या प्रति किलो भावातही सुधारणा होत आहे. MCX वर चांदीचा सप्टेंबर वायदा सुमारे 170 रुपयांच्या घसरणीसह 1,07,820 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत असून याआधी चांदीचा भाव 1,11,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीची चमक फिकीच
भारतीय वायदा बाजाराप्रमाणेच जागतिक बाजारातही सोन्याच्या किमती घसरत आहेत. मंगळवारनंतर कॉमेक्सवर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव कमी झाला आहे. कॉमेक्सवर सोन्याच्या वायद्यांमध्ये सुमारे अर्धा टक्क्यांची घसरण होत असून प्रति औंस $3300 वर आली आहे पण, चांदीचा दर आणखी मजबूत झाला आहे. कॉमेक्सवर चांदीच्या वायद्यांमध्ये किंचित वाढ होऊन $37 प्रति औंसवर व्यवहार होत आहे.