Teacher Protest: शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य! २० टक्के वाढीव पगार….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळाले असून, विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असं आश्वासन सरकारने दिले आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली.

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना देण्यात आलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावे, शाळांना २० टक्के टप्प्याटप्याने अनुदान यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं होतं. त्यांच्या या मागण्या सरकारने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात गिरीश महाजन म्हणाले की, “१८ तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल. त्यावेळी तुमच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल. मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत.” त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचं महाजन यांनी सांगितलं.

गिरीश महाजन काय म्हणाले?
गिरीश महाजन म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षकांसबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र थोड्या आर्थिक अडचणींमुळे मधल्या काही काळातील हफ्ते देण्यास उशीर झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेऊ नका, तुमचे काम आम्हीच करणार आहोत. पुरवणी मागण्यांमधे आज मांडता आले नाही, मात्र इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही. इथून पुढे हा पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल.”

काय आहे नेमके प्रकरण?
राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर १० महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही. या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचसोबत शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं. राज्यामध्ये सध्या ५८४४अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये ८२० प्राथमिक, १९८४ माध्यमिक व ३०४० उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ३,५१३ प्राथमिक, २,३८० माध्यमिक व ३,०४३ उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण ८,६०२ प्राथमिक शिक्षक, २४,०२८ माध्यमिक शिक्षक आणि १६,९३२ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *