Ganeshotsav 2025: गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित; आशिष शेलार यांची विधानसभेत माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुलै ।। मुंबई, पुण्यासह राज्यभरातील उत्सवासाठी लागेल तेवढा निधी राज्य सरकार खर्च करील. गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही महायुतीची आणि या सरकारची भूमिका आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून आपले सैन्य, सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आनंद होत असल्याचे शेलार यांनी या वेळी नमूद केले.

मुंबईसह राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव यापुढे राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या संदर्भातील घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली. दरम्यान, या उत्सवासाठी आवश्यक निधी खर्च करण्याची तयारीही शेलार यांनी बोलून दाखविली.

भाजप आमदार हेमंत रासने यांनी या संदर्भातील औचित्याचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. त्याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी वरील घोषणा केली. ही मागणी करताना हेमंत रासने म्हणाले, ‘सार्वजनिक गणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते घडविण्याचे काम केले, प्रबोधनाची परंपरा चालविली. शतकाचा वारसा असलेल्या या उत्सवावर निर्बंधांचे प्रमाण वाढत आहे.’ या उत्सवासाठी शंभर कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणीही रासने यांनी केली.

यावर आशिष शेलार म्हणाले, ‘सन १८९३मध्ये लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवाची पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वातंत्र्य, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. त्या पद्धतीनेच हा उत्सव आताही सुरू आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असा हा आपला गणेशोत्सव आहे. त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असेल.’ जगभरात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचारासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

विरोधक लक्ष्य
शेलार यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘काही लोकांनी वेगवेगळ्या कारणांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या सगळ्या निर्बंधांना, उत्सवाच्या मार्गातील गतिरोधक दूर करण्याचे काम केले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *