शहा-शिंदे भेटीत काय चर्चा? ‘सायलेन्स’मुळे वाढली आशा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुलै ।। गेल्या आठवड्यात मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत संपन्न झाला. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, अशा शब्दांत शिवसेना उबाठचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंशी युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे महापालिका निवडणुकांवरील परिणाम याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

येत्या दोन ते चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. त्यासाठी भाजपनं काही खासगी संस्थांच्या माध्यमातून सर्व्हे केलेले आहेत. त्याची माहिती अमित शहांनी एकनाथ शिंदेंना दिली. महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही ठाकरेंची युती झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका शिंदेसेनेला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंनी अचानक दिल्ली गाठून शहांची घेतलेली भेट महत्त्वाची आहे.

मुंबई महापालिका निवडणूक जिंकून तिथे आपला महापौर बसवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत ठाकरेंची युती झाल्यास त्याचे कसे परिणाम होतील, याबद्दल भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना चिंता वाटते. त्यातच भाजपचेच खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचणारी विधानं केली आहेत. त्यांची काही वक्तव्यं तर महाराष्ट्र द्वेष दाखवणारी आहेत. त्यामुळे याचे काय परिणाम होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ठाकरे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यास काय होईल, याबद्दल शहा आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. उद्धव यांनी राज ठाकरेंसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. पण राज यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला नाही. त्यांनी आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचे, माध्यमांशी न बोलण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे राज यांचं मतपरिवर्तन होण्याची शक्यता कितपत आहे, यावरदेखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

ठाकरे बंधूंवर टिकेचा रोख ठेवल्यास मुंबईतील हिंदी मतदार महायुतीच्या मागे एकवटतील का? ठाकरें बंधूची युती झाल्यास त्यांचा सामना करण्यासाठी मुंबईत अन्य कोणकोणत्या पक्षांना, नेत्यांना सोबत घेता येईल, अशा विविध विषयांवर शहा आणि शिंदे यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *