PCMC School: महापालिका शाळांचे खासगीकरण; पाच वर्षांसाठी मोजणार 41 कोटी रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुलै ।। देशात नावाजलेल्या दिल्ली म्युन्सिपल स्कूलप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेक योजना राबवून महापालिका शाळेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार, शाळांची प्रगती दिसून येत आहे. असे असताना प्रशासनाने अचानक महापालिकेच्या सहा शाळांचे खासगीकरण केले आहे. त्यासाठी पाच वर्षांसाठी तब्बल 40 कोटी 53 लाख 75 हजार रुपये मोजले जाणार आहेत. त्या माध्यमातून महापालिका शाळांच्या खासगीकरणाचा घाट घातल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. त्यात लाखो विद्यार्थी शिकत आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून शहरातील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच प्राथमिक शाळा चालविण्याची जबाबदारी मुंबई येथील आकाक्षा फाउंडेशन या खासगी संस्थेकडे दिली आहे. (Latest Pimpri News)

त्या खासगी संस्थेला सीएसआर निधी मिळत नसल्याचे कारण देत शिक्षण विभागाने महापालिका इतिहासात प्रथमच शाळा चालविण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली. प्रतिसाद न मिळाल्याने त्या निविदेस दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यात आकांक्षा फाउंडेशनची एकमेव निविदा पात्र ठरली. सहा शाळा पाच वर्षांसाठी चालविण्यासाठी महापालिका तब्बल 40 कोटी 53 लाख 75 हजार रुपये या संस्थेला देणार आहे.

दरम्यान, गेल्या 11 वर्षांपासून आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या पाच प्राथमिक शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणााया विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

त्या शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. महापालिका शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेचा सर्व खर्च कंपन्यांमधून मिळणार्‍या सीएसआर फंडातून केला जात होतो. मात्र, सीएसआर फंडातून खर्च भागविणे शक्य होत नसल्याचे आकांक्षा फाउंडेशनने महापालिकेला पत्र दिले.

फाउंडेशनने विनंती तात्काळ मान्य करीत महापालिकेच्या शिक्षण विभागाने 10 जूनला फाउंडेशनकडे असलेल्या पाच शाळासह आणि दिघी येथील एक शाळा असे एकूण सहा शाळा चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली.

सहा शाळांमधील 3 हजार 450 विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च 47 हजार 121 गृहित धरण्यात आला आहे. त्यानुसार एका वर्षाचा 16 कोटी 25 लाख 67 हजार 450 रुपये याप्रमाणे पाच वर्षांसाठी 82 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती

निविदेला दोन वेळा मुदतवाढ
या निविदेला दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही आकांक्षा फाउंडेशनची एकमेव निविदा आली आणि तीच पात्र झाली. त्यांना 100 पैकी 81 गुण मिळाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. फाउंडेशनने प्रत्येक विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च 27 हजार रुपये दर दिला आहे. पाच वर्षांचा 46 कोटी 57 लाख खर्च होईल, अशी दर सादर केला.

मात्र, शिक्षण विभागाने दर कमी करण्यासाठी फाउंडेशनकडे विचारणा केली. फाउंडेशनने प्रत्येक विद्यार्थी वार्षिक खर्च कमी करून 23 हजार 500 रुपये असा दर दिला. त्यानुसार वर्षाला 8 कोटी 10 लाख 75 हजार रुपये खर्च येतो. त्यानुसार फाउंडेशनला सहा शाळा चालविण्यासाठी पाच वर्षांसाठी तब्बल 40 कोटी 53 लाख 75 हजार रुपये दिले जाणार आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

महापालिका सीएआर कक्ष असताना शिक्षण विभागाचे वेगळे पाऊल

महापालिकेच्या विविध कामे व प्रकल्पांसाठी सीएसआर निधी जमा करण्यासाठी महापालिकेने सीएसआर कक्ष स्थापन केला आहे. त्या कक्षाकडून शहरातील खासगी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळविला जातो. त्या माध्यमातून महापालिकेचे विकासकामे केली जात आहेत.

कोरोना महामारी काळात या कक्षाने मोठ्या प्रमाणात निधी तसेच, वैद्यकीय यंत्रसामुग्री सीएमआरमधून उपलब्ध करून दिली होती. त्या कक्षामार्फत आकांक्षा फाउंडेशन चालवित असलेल्या शाळांसाठी निधी उभारणे सहज शक्य आहे. असे असताना फाउंडेशनच्या ताब्यात सहा शाळा देऊन कोट्यवधीची उधळपट्टी करत खर्च करण्यात येत असल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

या शाळांचे खासगीकरण

पिंपरी येथील अनुसया नामदेव वाघेरे शाळा, कासरवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शाळा, काळेवाडी येथील कै. दत्तोबा रामचंद्र काळे शाळा, बोपखेल येथील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा, मोशी येथील सावित्रीबाई फुले शाळा या पाच शाळा यापूर्वीच आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून चालविल्या जात होत्या. यामध्ये आता दिघीतील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेची भर पडली आहे.

महापालिका शिक्षक, कर्मचार्‍यांवर गदा ?महापालिकेच्या या सहा शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक व इतर कर्मचारी कार्यरत आहेत. खासगीकरण केल्याने या शाळांतील सर्व मनुष्यबळ बेकार होणार आहे. त्यांचे महापालिकेच्या इतर शाळांमध्ये समायोजन केले जाईल. मात्र, भविष्यात याच पद्धतीने हळूहळू एका एका शाळेचे खासगीकरण झाल्यास महापालिकेचा शाळांची संकल्पनाच मोडित काढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

सीएसआर फंड कमी पडत असल्याने निविदा

आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून सीएसआर फंडातून पाच प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविल्या जात होत्या. फाउंडेशनला सीएसआर फंडाचा निधी कमी पडत होता. त्यामुळे या वर्षी प्रथमच निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार सहा शाळा चालविण्यासाठी पाच वर्षांला 40 कोटी 53 लाख 75 हजार रुपये आकांक्षा फाउंडेशनला देण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगरयांनी सांगितले.

असा आहे हिशोब

सहा शाळेत एकूण : 3 हजार 450 विद्यार्थी

एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च :23 हजार 500 रुपये

वर्षाचा खर्च : 8 कोटी 10 लाख 75 हजार रुपये

पाच वर्षांचा खर्च : 40 कोटी 53 लाख 75 हजार रुपये अधिक जीएसटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *