महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। उत्पादन शुल्कातील तब्बल ६० टक्के वाढ आणि भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त दहा टक्के कर तसेच वार्षिक परवाना शुल्कात पंधरा टक्के दरवाढीच्या विरोधात राज्यातील बारचालकांनी (Maharashtra Bar Strike) सोमवारी (ता. १४) बंदची घोषणा केली आहे.
या बंदला ‘हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’ने (HRAWI) पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्र आधीच अनेक अडचणींना सामोरे जात आहे. उत्पादन शुल्कातील तब्बल साठ टक्के वाढ तसेच इंडियन मेड फॉरेन लिकरच्या एफएल ३ आउटलेट्सवरील विक्रीवर दहा टक्के कर लावणे.
तसेच चालू आर्थिक वर्षासाठी वार्षिक परवाना शुल्कात पंधरा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय योग्य नाही. हा बंद म्हणजे आमचा ‘सामूहिक आक्रोश’ आहे, असे ‘एचआरएडब्ल्यूआय’चे अध्यक्ष जिम्मी शॉ म्हणाले. आंदोलनाला प्रमुख हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनकडून पाठिंबा मिळाला आहे.