महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुलै ।। गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता.
त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यांवरून देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्ती करणार असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून आता राज ठाकरे यांनी जाहीर आव्हान दिलं आहे.
“दुकानं नाही, शाळाही बंद करेन…”
“हिंदी भाषा पहिलीपासून शिकली पाहिजे म्हणे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की तिसरी भाषा हिंदी करणार म्हणजे करणार. मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला. तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर करा. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पाहा. दुकानंच नाही, शाळाही बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय?”, असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी भाषेसाठी भांडतायेत. इतर शाळेत तुम्ही मराठी सक्ती केली पाहिजे. ते सोडून तुम्ही हिंदी भाषा सक्तीच्या मागे लागलात. तुमच्यावर कोण दबाव टाकतंय? केंद्र सरकार हे आतापासून नाही तर हे आधीपासूनच सुरु आहे”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. यावेळी मराठीच्या मुद्यावरून राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, “कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. मिठाईवाल्याचा काय प्रसंग घडला. विनाकारण काहीतरी कारणं असतात. त्या माणसाच्या अरेरावीमुळे कानफटात बसली. बाकी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानफटात मारली का? अजून मारली पाहिजे. राजकीय पक्षांचं ऐकून बंद वगैरे केला. मराठी व्यापारी नाहीयेत का? महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.