महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुलै ।। राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस गायब झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत आहे तर काही जिल्हयांमध्ये पावसाने दडी मारली आहे. सध्या कोकण आणि विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरीत राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांनी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, १९ ते २२ जुलै दरम्यान पावसाचा जोर कमी होणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. मराठवाड्यात देखील १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.
दरम्यान, जून आणि जुलै महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर मराठवाड्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षी राज्यात मे महिन्याच्या शेवटी पाऊस दाखल झाल्यामुळे मे महिन्याच्या शेवटी झालेल्या मुसळधार पाऊस आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.पण मराठवाड्यात मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला.