महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 22 जुलै ।। जुलै महिन्यातील पहिले २० दिवस फारसा पाऊस न झालेल्या मुंबईने रविवारी रात्रीपासून मात्र जोरदार पाऊस अनुभवला आणि अखेर जुलैचा पाऊस भेटीला आल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली. रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. सोमवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणामध्ये पुढील चारही दिवस ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईमध्येही बुधवार, गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईमध्ये सांताक्रूझ केंद्रावर रविवारी स. ८.३० ते सोमवारी स. ८.३० या २४ तासांत ११४.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचवेळी कुलाबा येथे केवळ ११.२ मिमी पाऊस नोंदला गेला. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला होता. अलिबाग येथे ९० मिमी, मुरुड ७७ मिमी, श्रीवर्धन ६५ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण कोकणात पावसाचा जोर येत्या चार ते पाच दिवसांमध्ये वाढण्याचा अंदाज आहे. मुंबईमध्ये सोमवारी स. ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत सांताक्रूझ येथे ८७ मिमी, तर कुलाबा येथे केवळ आठ मिमी पावसाची नोंद झाली. विलेपार्ले, सांताक्रूझ येथे ९० मिमीहून अधिक पाऊस दिवसभरात नोंदला गेला.
मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले असून, आता वातावरणीय स्थितीही पावसासाठी अनुकूल असल्याची माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली. आर्द्रता वाढली असून वाऱ्यांचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण ओडिशाच्या वर हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे, तसेच उत्तर कर्नाटक ते आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात उत्तरेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून यामुळे राज्यातील पावसाला २७ जुलैपर्यंत चालना मिळेल, असा अंदाज आहे.
नद्यांना पूर, रस्ते पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकणात मुसळधार पाऊस!
कोकणाला शुक्रवारपर्यंत ‘ऑरेंज ॲलर्ट’
मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. या तुलनेत उत्तर कोकणात पावसाचा जोर कमी असेल. बुधवार, गुरुवारी तुरळक ठिकाणी मुंबई, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडू शकेल. ठाणे जिल्ह्याला गुरुवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ आहे. पालघरमध्ये बुधवारी, गुरुवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. कोल्हापूर, सातारा घाट परिसराला मंगळवारपासून, तर पुणे घाट परिसराला बुधवारपासून ‘ऑरेंज ॲलर्ट’ आहे.