महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ता. २३ राेजी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात येत आहेत. यावेळी ते बहुचर्चित कॉरिडॉरबद्दल काही महत्त्वाच्या घोषणा करतीलच. कारण, एकादशीनंतर लगेचच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक झाली. कॉरिडॉर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. काशी आणि उज्जैन येथील कॉरिडॉरच्या धर्तीवर दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॉरिडॉर (विकास आराखडा) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉरिडॉरमध्ये काय काय असणार याची उत्सुकता राज्यात वाढत चालली आहे.
पंढरपुरात दररोज किमान लाखभर भाविक दर्शनासाठी येतात. आषाढी कार्तिकीसह प्रमुख चार यात्रांसाठी तर लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. यंदाच्या आषाढी वारीत विक्रमी २० लाखाहून अधिक भाविक पंढरीत आल्याची नोंद झाली आहे. पंढरपूरच्या विठुरायाची महती जगभर पोचावी, देश विदेशातून पर्यटक आणि भाविक पंढरपूरला यावेत. पंढरपूरचा विकास धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून व्हावा. त्यातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हजारो कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे पंढरपुरच्या सौंदर्यात भर पडणार आहेच, शिवाय आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासासाठी नवी संधी मिळणार आहे.
पंढरपुरातील कॉरिडॉर हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. विकास आराखडा राबवताना स्थानिकांना विश्वासात घेऊन राबवला जाणार आहे. भूसंपादन आणि त्याचे परिणाम याचाही यामध्ये विचार केला जाणार आहे. भूसंपादन करताना मालमत्ताधारकांना विश्वासात घेऊनच पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
– संतोष देशमुख, कॉरिडॉर भूसंपादन अधिकारी, पंढरपूर
असा असेल काॅरिडाॅर
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पाहणी केली. यात सुमारे ६३० मालमत्ताधारक बाधित होणार आहेत. बाधित लोकांना योग्यप्रकारे आर्थिक मोबदला देण्यासाठी एक पॅकेज देखील तयार केले आहे. काहींनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले आहे तर काही स्थानिक लोकांनी मात्र आर्थिक मोबदला समाधानकारक मिळाला तर आम्ही जागा देऊ अशी तयारीही दर्शवली आहे. चर्चेनंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे. सध्यातरी शासन कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉरिडॉर तयार करण्यावर ठाम आहे. तशी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्याच्या कार्यक्रमात कॉरिडॉरबाबत काय भाष्य करतात, याकडे पंढरपूरकरांसह राज्यातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
हा कॉरिडॉर चौफळा ते महाद्वारपर्यंत तयार केला जाणार आहे. यामुळे मंदिर परिसरात जवळपास दोन्ही बाजूला तीनशे मीटर परिसर मोकळा राहणार आहे. मंदिर परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.