महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारी बुलेट ट्रेन नेमकी कधी सुरू होणार, याबाबत अनेकदा देशवासीयांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात चर्चा असते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली आहे. देशातील आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सध्याच्या बांधकाम स्थितीबद्दल काही सदस्यांनी प्रश्न विचारले होते.
सभागृहातील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, महाराष्ट्र ते साबरमती हा संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प डिसेंबर २०२९पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या गुजरातमध्ये वापी ते साबरमतीदरम्यान रेल्वे कॉरिडॉरचे काम सुरू असून ते डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ५०८ किलोमीटर लांबीच्या ‘मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल’ (एमएएचएसआर) प्रकल्पाचे (बुलेट ट्रेन) काम जपानच्या तांत्रिक व आर्थिक मदतीने सुरू आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली.
गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा व नगरहवेलीमधून जाणार
ही रेल्वे गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा व नगरहवेलीमधून जाणार असून त्यावर मुंबई, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलिमोरिया, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती ही १२ स्थानके आहेत. वैष्णव यांनी माहिती दिली की, हा अतिशय गुंतागुंतीचा आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. त्याच्याशी संबंधित सर्व स्थापत्य बांधकाम, रेल्वेरूळ, विद्युत, सिग्नल, दूरसंचार आणि रेल्वेसंचाचा पुरवठा पूर्ण झाल्यानंतरच तो नेमका कधी पूर्ण होईल ते सांगता येईल, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.