महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। वेस्ट इंडिजला मायदेशात एकापाठोपाठ एक मालिकांमध्ये लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला पूर्णपणे पराभूत केले आणि त्यानंतर पाचव्या व अंतिम टी-20 सामन्यात 171 धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पार करत 5-0 ने मालिका आपल्या नावे केली. अशाप्रकारे, वेस्ट इंडिजला मायदेशात सलग 8 सामन्यांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियाने पाचवा टी-20 सामना 3 गडी राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत प्रथमच सर्व सामने जिंकून मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे, की संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सर्व सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलिया आता पाच सामन्यांची टी-20 मालिका 5-0 ने जिंकणारा जगातील दुसरा पूर्ण सदस्य देश ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी केवळ भारताने केली होती. भारताने 2020 साली न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर 5-0 ने पराभूत केले होते.
आतापर्यंत केवळ 6 संघांनीच केली आहे अशी कामगिरी
भारताने 2020 मध्ये सर्वप्रथम ही कामगिरी केली होती आणि त्यानंतर आजपर्यंत 100 हून अधिक क्रिकेट खेळणाऱ्या देशांपैकी केवळ 6 संघांनीच हा पराक्रम केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त मलेशिया, केमन आयलंड्स, टांझानिया आणि स्पेन यांनीही 5-0 ने टी-20 मालिका जिंकली आहे. स्पेनने तर हा पराक्रम दोनदा केला आहे; 2024 मध्ये क्रोएशियाविरुद्ध आणि आईल ऑफ मॅन विरुद्ध. मात्र, आईल ऑफ मॅनविरुद्धचा त्यांचा 5-0 चा विजय हा 6 सामन्यांच्या मालिकेतील होता.
टी-20 मालिका 5-0 ने जिंकणारे संघ
भारत विरुद्ध न्यूझीलंड, 2020
मलेशिया विरुद्ध हाँगकाँग, 2020
केमन आयलंड्स विरुद्ध बहामास, 2022
टांझानिया विरुद्ध रवांडा, 2022
स्पेन विरुद्ध क्रोएशिया, 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, 2025
ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश
टी-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियन संघाने या दौऱ्यातील सर्व 8 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकण्याचा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ संपूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 19.4 षटकांत 170 धावांवर सर्वबाद झाला. शिमरॉन हेटमायरने 31 चेंडूंत सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश होता. रदरफोर्डने 17 चेंडूंत 35 धावांचे योगदान दिले.
171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात विशेष झाली नाही आणि संघाचे 4 गडी 60 धावांच्या आतच बाद झाले. यानंतर, मधल्या फळीतील कॅमेरॉन ग्रीन, मिचेल ओवेन आणि ॲरॉन हार्डी यांच्या संयमी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 17 षटकांतच सामना जिंकला.