महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। लाडकी बहीण योजनेत अनेक घोटाळे झाले आहेत. दरम्यान, आता तर लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे पुरुष लाभार्थी झालेच कसे? याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता या पुरुषांवरकारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी काय दिले निर्देश?
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्देश दिले आहेत, असं सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ कसा घेतला, सरकारची फसवणूक झाली असेल तर ही बाब गंभीर आहे. करावाई करा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसणारी एकही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, त्यामुळे पात्र नसलेल्या महिलांना लाभ मिळाला नाही पाहिजे याकडेही लक्ष दिले पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांच्या छाननीबाबत आणि विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी महिलांनी घेतला आहे, असं समोर आल्यास वसूली केली जाईल. २६ लाख लाभार्थी महिलांचा डेटा आम्हाला दिला आहे. आता त्यात अपात्र किती याची छाननी केली जात आहे.
पुरुषांनी लाभ घेतला, त्याच काय
जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, काही महिलांच्या नावे बँक खाती नसतील तर पुरुषांच्या नावाने असलेल्या खात्यात जमा झाल्याची शक्यता आहे. ही बाब आम्ही तपासून पाहत आहोत. दरम्यान, सरकारी कर्मचारी महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर वसुली केली जाईल, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीही स्पष्ट केले आहे.