महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – दि. १ सप्टेंबर – कोरोनाच्या प्रादुर्भावाला देशात मार्च महिन्यात सुरुवात झाली, तेव्हापासून पुणे जिल्हा प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पुण्यातच राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा नोंदवला गेला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. पण यामध्ये अद्याप तरी म्हणावे तसे यश आलेले नाही.सोमवारी १,९३१ कोरोनाबाधित रुग्ण पुणे शहरात आढळून आल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत राजधानी दिल्लीलाही पुणे शहराने मागे टाकलं आहे. १,७५,१०५ ऐवढी पुण्यातील एकूण रुग्णसंख्या झाली असून १,७४,७४८ एवढी दिल्लीची रुग्णसंख्या असल्यामुळे पुणे शहर हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले शहर बनले आहे. दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या ३६ लाखांच्या पार पोहोचली असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
देशातील सर्वाधिक ५२,१७२ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुण्यात आहेत. जे मुंबईतील २०,००० आणि दिल्लीतील १५,००० यांच्यापेक्षा खूपच अधिक आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात आजवर ४,०६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,१८,३२४ रुग्ण बरे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, सोमवारी देशातील करोनाबाधितांची संख्या ३६,२१,२४५ वर पोहोचली असून यांपैकी २७,७४,८०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर ४ कोटी २३ लाख ०७ हजार ९१४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.