महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ ऑगस्ट ।। राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. 2029 पर्यंत राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील 82 हजार 634 कोटी रुपयांच्या 245 प्रकल्पांचे काम पूर्ण होणार असल्याची लेखी माहिती लोकसभेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी लेखी उत्तर देताना ही आकडेवारी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उत्तरात म्हटले की, महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीसाठी चालू वर्षासह गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने 1 लाख 4 हजार 294 कोटी रुपये खर्चाचे एकूण 371 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी 21 हजार 660 कोटी रुपये खर्चाचे 126 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित 245 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प 82 हजार 634 कोटी रुपये खर्चाचे आहेत. 2028-29 आर्थिक वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील.
महाराष्ट्रात एकूण 18 हजार 462 किमी लांबीचे 102 राष्ट्रीय महामार्ग
नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण 18 हजार 462 किलोमीटर लांबीचे एकूण 102 राष्ट्रीय महामार्ग (एनएच) आहेत. राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि देखभाल ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या महाराष्ट्रात 97 हजार 728 कोटी रुपयांचे 259 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत, असे ते म्हणाले.