Panic Button: आता प्रवासी वाहनांत पॅनिक बटन यंत्रणा नसलेले रडारवर ; आरटीओकडून वाहनचालकांना नोटिसा देण्यास सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।।  प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असलेले व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (व्हीएलटीडी) आणि पॅनिक बटन ही प्रणाली सध्या बहुतांश वाहनांमध्ये निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिवहन विभागाने तत्काळ कठोर पावले उचलत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वाहनांमध्ये व्हीएलटीडी प्रणाली आणि पॅनिक बटन निष्क्रिय आहे, अशा चालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. सात दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित न झाल्यास सात दिवसांत संबंधित वाहनमालकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई (पश्चिम) च्या प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी सादर केलेल्या अहवालानंतर ही बाब समोर आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची असल्याने, याकडे दुर्लक्ष करणे गंभीर बाब मानली जात आहे.

महिलांना मिळणार तत्काळ मदत
सार्वजनिक वाहनातून प्रवास करणार्‍या महिलांना असुरक्षित वाटू लागल्यास किंवा सहप्रवासी, चालकाकडून गैरकृत्य केले गेल्यास मदत मागण्यासाठी ‘पॅनिक बटन’चा वापर करता येईल. हे बटन दाबल्यानंतर संबंधित कंट्रोल रूमला त्याची माहिती मिळेल. तसेच, त्या वाहनाचे ‘लोकेशन’ही माहिती होईल. यासाठी परिवहन विभागाकडून अंधेरी येथे राज्यस्तरीय कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. राज्यभरातील वाहनांच्या देखरेखीचे कामकाज येथूनच चालणार आहे. येथे पॅनिक बटनाद्वारे माहिती आल्यास प्रवाशांना तत्काळ मदत मिळणार आहे.

…अशी झाली पॅनिक बटन यंत्रणेची भागदौड
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांमध्ये ‘पॅनिक बटन’ बसविण्याची सक्ती केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी 01 एप्रिल 2018 पासून करण्याबाबतचे परिपत्रक यापूर्वीच काढण्यात आले आहेत.

तेव्हापासून आत्तापर्यंत अंमलबजावणीसाठी शासनाने उदासीनताच दाखविली होती. त्यानंतर परिवहन विभागाने 01 जानेवारी 2019 नंतर नोंदणी होणार्‍या नव्या वाहनांना ‘पॅनिक बटन’ बसविणे बंधनकारक केले. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित झाली नव्हती. अखेर शासनाने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 20 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद केली. त्यानंतर आता या निधीतून अंधेरी येथे कमांड कंट्रोल रूम तयार केले आहे. आता त्याला सर्व व्हीएलटीडी जोडण्याचे काम सुरू आहे.

’वाहन शक्ती’ या संगणकीय प्रणालीवर नोंद होणार
परिवहन विभागाच्या ‘वाहन शक्ती’ या संगणकीय प्रणालीवर व्हीएलटीडी बंद असलेल्या वाहनांची यादी तयार केली जात आहे. या यादीनुसार संबंधित वाहनमालकांना नोटीस पाठवून, त्यांना सात दिवसांच्या आत ही प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.

नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर सात दिवसांच्या आत ही प्रणाली सक्रिय केली नाही, तर संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी त्यांच्या वाहनात बसवलेले व्हीएलटीडी उपकरण परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाने प्रमाणित केलेले आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच, हे उपकरण पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी व्हीएलटीडी विक्रेता किंवा सेवा पुरवठादाराशी संपर्क साधावा, असेही आदेशात म्हटले आहे.

पॅनिक बटन आणि व्हीएलटीडी ही यंत्रणा 2019 पासूनच सुरू करण्याचे आदेश होते. मात्र, अद्याप ही यंत्रणा सुरू व्हायला इतके दिवस का लागत आहेत? हा प्रश्न पडत आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले गेले. असाही प्रश्न उपस्थित होतो. मात्र, हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे किमान परिवहन आयुक्त पातळीवर हालचाली झाल्या, याबद्दल त्यांचे आभार, त्यांनी दाखवलेली ही तत्परता, महिला प्रवाशांसाठी रक्षाबंधनाची भेट ठरेल.

– संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *