महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। पुढील वर्षी होणार्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने आपली सलामीची जोडी निश्चित केली आहे. कर्णधार मिचेल मार्श स्वतः स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडसोबत डावाची सुरुवात करणार असल्याची अधिकृत घोषणा त्याने केली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर सलामीच्या जागेसाठी सुरू असलेला शोध या निर्णयामुळे संपला आहे.
विशेष म्हणजे, 2021 च्या टी-20 विश्वचषकात मार्शने तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. आता कर्णधार म्हणून तो स्वतः सलामीची जबाबदारी स्वीकारणार आहे.
मार्श आणि हेड यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एकत्र सलामी दिली नसली तरी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांची जोडी अत्यंत यशस्वी ठरली आहे. त्यांनी 5 डावांमध्ये 70.50 च्या उत्कृष्ट सरासरीने 282 धावा केल्या आहेत. वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांसारख्या खेळाडूंना सलामीला आजमावले होते, पण आता संघ व्यवस्थापनाने मार्श-हेड जोडीवर विश्वास दाखवला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी पत्रकारांशी बोलताना मार्शने संघाच्या भविष्यातील योजनेवर शिक्कामोर्तब केले. तो म्हणाला, भविष्यात मी आणि हेड संघासाठी डावाची सुरुवात करू. आम्ही एकमेकांना उत्तम जाणतो आणि एकत्र भरपूर क्रिकेट खेळलो आहोत. आमची वेव लेंग्थ उत्तम जुळते. त्यामुळे आम्ही सलामीला उत्तम योगदान देऊ शकतो.
दरम्यान, मार्शने दुखापतीमुळे सध्या गोलंदाजी करणार नसल्याचेही स्पष्ट केले. सध्या मी गोलंदाजीपासून दूर आहे, पण हा निर्णय कायमस्वरूपी नाही. विश्वचषकापूर्वी आमच्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ आहे आणि आम्ही आमच्या खेळाच्या शैलीवर काम करत राहू, असेही तो म्हणाला.