महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -लक्ष्मण रोकडे – दि. १ सप्टेंबर – मोठय़ा प्रमाणात कामगार वस्ती असलेली पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. करोनामुळे मार्च महिन्यापासून सर्वच घटकांना जबर फटका बसला आहे. त्यामुळे पालिकेचा मिळकतकर भरणे जिकिरीचे होईल. त्यादृष्टीने दिलासा देण्यासाठी पालिका हद्दीतील सर्व कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, लघुद्योग यांच्या निवासी, बिगरनिवासी तसेच औद्योगिक मिळकतींवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मिळकतकर माफ करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला,
पिंपरी-चिंचवड – कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार, व्यावसायिक, उद्योगांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मार्चपासूनचा गेल्या सहा महिन्यांचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिका सभेने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असले,तरी राज्यशासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच याची अंमलबजावणी होऊ शकणार आहे.
टाळेबंदीमुळे शहरातील सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय बंद होते. त्यामुळे त्यांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले. ही परिस्थिती लक्षात घेऊन मार्च, एप्रिल, मे अशा तीन महिन्यांचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी २० मेच्या बैठकीत घेतला होता. प्रत्यक्षात, याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला नाही. त्यामुळे घोषणेनंतरही कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पालिका सभेत करोनाविषयक प्रस्तावाला उपसूचना देत घाईने हा विषय मांडण्यात आला. त्यानुसार, सहा महिन्यांचा मिळकतकर माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले,की टाळेबंदीमुळे पालिका सभा झाल्या नव्हत्या. त्यामुळे उशिराने विषय मांडला गेला.