महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। भोर – प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा संदेश देणारा रक्षाबंधनाचा सण भोरमध्ये यंदा खास पद्धतीने साजरा करण्यात आला. कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात दिव्यांग बांधवांसाठी अनोख्या स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात अंध, अपंग, मूकबधिर अशा विविध दिव्यांग बांधवांच्या हातावर राखी बांधण्यात आली. त्यांना फळाहार, गोडधोड आणि भेटवस्तू देऊन आनंद साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्षा सौ. वैशाली पाटील यांनी दिव्यांग बांधवांशी स्नेहसंवाद साधत रक्षाबंधन हा फक्त सण नसून प्रेम, आधार आणि संरक्षणाचा धागा असल्याचे सांगितले. “हा धागा फक्त भावंडांपुरता न ठेवता, समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा,” असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला भोर-वेल्हा-मुळशीचे माजी आमदार माननीय संग्रामदादा थोपटे, पंचायत समिती गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव, ज्येष्ठ पत्रकार व तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुरेश शेटे, रुग्ण कल्याण समिती सदस्य व दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार विलास मतगुडे, शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष मोहिते, प्रहार संघटना अध्यक्ष बापू कुडले, उपाध्यक्ष महेंद्र सोनवणे,अनिल चव्हाण पीएसआय भोर पोलिस स्टेशन, महिला उपाध्यक्ष संगीता शिवतारे, संपर्क प्रमुख भानुदास दुधाने, सचिव शांताराम खाटपे, महिला संपर्क प्रमुख राणी ताई शिंदे, सदस्य वर्षाताई वल्लेवार, शंकर खोंडगे, अनिल दळवी, विद्या कोतवाल, मनीषा समर्थ, प्रो. अर्चना कल्याणी, मनीषा गिरमे, विजया घुले, सूर्यकांत घोणे, सतीश कालेकर, भूषण पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कालेकर यांनी केले. त्यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या भावपूर्ण गीतांनी वातावरण अधिक रंगतदार केले. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना प्रेम, आधार आणि सामाजिक सहभागाचा संदेश दिला.
कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांसोबत साजरा झालेला हा अनोखा स्नेहबंधाचा उत्सव त्यांच्या मनात कायमची गोड आठवण बनून राहिला.