Maharashtra Weather News : पुढील 6 दिवसात राज्यात पुन्हा जोरदार पाऊसधारा? ; पहा हवामान अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळं कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आता मात्र पुन्हा एकदा ही अनपेक्षित तापमानवाढ दूर होणार असून निमित्त ठरणार आहे ते म्हणजे राज्यात वाढणारं पर्जन्यमान.

हवामान विभागाच्या निरीक्षणानंतर समोर आलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. ज्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये बुधवारपासून पावसानं जोर धरला. काही भागांत तुरळक तर काही भागांत पावसाच्या जोरदार सरीनी हजेरी लावली. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान विभागाच्या निरीक्षणाच्या आधारे जारी केलेल्या माहितीनुसार 13 ते 19 ऑगस्ट या दिवसांमध्ये राज्याला पावसाच्या जोरदार सरी झोडपून काढणार आहेत. शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असून, त्यामुळं आता श्रावणसरींपेक्षा हा पुन्हा नव्यानं सक्रिय झालेला मान्सूनच अडचणींमध्ये अधिक भर टाकताना दिसणार आहे.

अचानक कुठून परतला पाऊस?
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्येसुद्धा पावसासाठी पूरक अशा कैक हालचालींना मागील दिवसांमध्ये वेग आल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल. तर विदर्भसुद्धा इथं अपवाद ठरणार नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

कोणत्या भागांना झोडपणार पाऊस?
विदर्भात प्रामुख्यानं पाऊस अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना झोडपणार असून, या भागांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा, कोल्हापूर घाटमाथा इथंही पावसाचा जोर वाढलेला असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर आणि वर्ध्यासह गडचिरोलीसाठीसुद्धा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *