![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हडपसर टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनला पर्यायी रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असलेले हडपसर टर्मिनलचे काम डिसेंबरअखेरपर्यंत होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास सुरू होणार असल्यामुळे हरंगुळ एक्स्प्रेससह ८ रेल्वेगाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे हडपसर येथून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या ११ होणार आहे. परिणामी पूर्व पुण्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी ही दोन स्थानके टर्मिनल म्हणून विकसित केली जात आहे. या दोन्ही टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू असून ही कामं डिसेंबरअखेरपर्यंत सुरू केली जाणार आहेत. हडपसर टर्मिनल येथे सध्या तीन फलाट आहेत. या ठिकाणाहून हैदराबाद एक्स्प्रेस, जोधपूर एक्स्प्रेस या दोन गाड्या सुरू आहेत. रिवा एक्स्प्रेस ही गाडी नव्याने सुरू करण्यात आली आहे. येथून डेमू सुरू आहेत. तसेच काही एक्स्प्रेसला हडपसर टर्मिनल येथे थांबा देण्यात आला आहे.
आता हडपसर टर्मिनल येथे दोन नवीन ‘स्टेबलिंग लाइन’ तयार झाल्या आहेत. त्या मुख्य मार्गासोबत जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी आवश्यक असलेली जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यामुळे हडपसर टर्मिनलचा विकास होत आला आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून विकासाची कामे वेगाने सुरू आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाचा विकास आणि रिमॉडेलिंगचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यावेळी पुणे रेल्वे स्थानक येथून एक्स्प्रेस गाड्या इतर ठिकाणी हलवाव्या लागणार आहेत. त्यापैकी काही गाड्या हडपसर टर्मिनल येथून सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये हरंगुळ एक्स्प्रेससह आठ गाड्या आहेत. पुणे-लातूर तेथून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हडपसर रेल्वे स्थानकाचा वापर वाढणार आहे.हडपसर टर्मिनलवरून एक्स्प्रेस गाड्या हळूहळू वाढवण्यात येत आहेत. सध्या जोधपूर, हैदराबाद, रिवा एक्स्प्रेस सुरू आहेत. येथून डेमू गाड्यादेखील सुटतात. या ठिकाणाहून सध्या ६ ते ७ हजार प्रवासी प्रवास करत आहेत.
हडपसर टर्मिनलसाठी खर्च किती?
फलाटांची संख्या- ३
स्टेबलिंग लाइन- २
टर्मिनलसाठी खर्च- ९८ कोटी
सध्या सुटणाऱ्या एक्स्प्रेसची संख्या- ३
प्रवास करणारे प्रवासी- ६ ते ७ हजार
