महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑगस्ट ।। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन-तीन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीआधीच पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी गृह विभागाने पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. यामध्ये बीड, लातूर, अमरावती या जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आगामी निवडणुकीआधीच पोलिस दलात बदल्यांचा धडाका सुरु झाला आहे. राज्यातील १५ सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. बीड, लातूर, अमरावती यांसारख्या अनेक जिल्ह्यातील सहायक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारी सुधीर हिरेमठ यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर येथील मुख्यालयातील पोलीस उप अधीक्षक मच्छिंद्र रमाकांत पंडीत यांची सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईतील नागरी हक्क संरक्षण विभागातील पोलीस उप अधीक्षक मधुलिका महेशकुमार ठाकूर यांची नागपूरमधील नागरी हक्क संरक्षण विभागात पोलीस उप अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यात १५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश
राज्यात काही दिवसांपूर्वी १५० पेक्षा अधिक पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नतीचे आदेश देण्यात आले होते. यात सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलिस उपअधी क्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी पदासाठी असलेल्या पदावर पदोन्नतीचा समावेश होता. मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर शहरातील अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश दिल्या होत्या. तसेच राज्यातील ३५ सहायक पोलिस आयुक्तांच्या देखील बदल्या झाल्या.
भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची बदली
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची बदली करून इतरत्र नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार (भाप्रसे) यांची भंडाऱ्याच्या नव्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीये.