Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या ‘या’ गोष्टी आजपासून फॉलो करा !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। गोपाळकाल्याचा(Gopalkala 2025) उत्सव! हा उत्सव कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. विशेषतः कलियुगात टिकून राहण्यासाठी कृष्णनीती समजून उमजून आचरणात आणायलाच हवी.

मात्र, आपण कृष्णकथेतला भाग सोयीस्कररीत्या वापरतो. तसे करणे योग्य नसून कृष्णाशी समरसून जायचे असेल तर कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंश आपल्यात उतरवून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठीच भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य चरित्रातून आत्मसात करण्यासारख्या पाच गोष्टी शिकून घ्या.

श्रीकृष्णाकडे नेतृत्त्वाचे अनन्यसाधारण गुण होते. लोकसंग्राहाचे गुण त्याच्याजवळ होते. श्रीकृष्णाचा लहानात लहान मित्रांशी तसेच विद्वानांशी किंवा अधिकाऱ्यांशी सारखाच प्रेमभाव होता. त्याच्या अप्रतिम नेतृत्त्वाचे मूळ होते, त्याचा अपूर्व स्वार्थत्याग. म्हणूनच लोकांचा त्याच्यावर अक्षय विश्वास होता. तुम्हाला नेतृत्त्व करायचे असेल तर लोकसंग्रह करायला शिका, नाहीतर एकटे पडाल.

आपण छोट्या मोठ्या कारणाने चिडतो, डोक्यात राग घालून घेतो. मात्र कृष्ण रागाने नाही तर बुद्धीने, चलाखीने, नीतीने समोरच्याचा पराजय करत असे. शिशुपालाचे १०० अपराध पूर्ण झाले तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. कृष्णाकडे इंद्रिय निग्रह होता व स्थितप्रज्ञता होती. त्याच्याप्रमाणे आपणही संयम बाळगायला हवा आणि अचूक वेळ साधून प्रतिशोध कसा घेतात हे शिकायला हवे.

कृष्ण महान असूनही त्याच्या ठायी कमालीची विनम्रता होती. राजसूय यज्ञाच्या वेळी अतिथींचे चरण धुण्याचे आणि उष्ट्या पत्रावळी उचलण्याचे काम त्याने केले. मानवतेसाठी त्याने आपले आयुष्य वाहिले होते. एवढी युद्धे केली पण स्वतःसाठी काही घेतले नाही. कृष्ण निष्काम कर्म मानणारा होता. म्हणून तो प्रिय ठरला. ज्याला लोकप्रिय व्हायचे आहे, त्याला विनम्र व्हावे लागते, त्याग करावा लागतो, क्षमाशीलता अंगी बाणावी लागते.

श्रीकृष्णाने केवळ सत्तारूढ व दुष्ट शासकांचाच वध केला होता. कारण ते संस्काराने सुधारत नाहीत किंवा कुणाचे काही ऐकायला तयार होत नाहीत. त्यांची जातकुळीच वेगळी असते. म्हणजेच कलियुगात ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला आपणही शिकले पाहिजे. सतत लोण्याहून मऊ आणि वज्राहून कठोर होऊन चालत नाही, परिस्थितीनुरूप वागावे लागते, त्याचाच विजय होतो.

श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व दिव्य होती. साधूता आणि सज्जनता यांची साक्षात तो मूर्ती होता. श्रीकृष्णाचे तत्वज्ञान मानवजातीला मिळालेली अप्रतिम भेट आहे. भगवद्गीतेचे वाचन आयुष्यात जितक्या कमी वयात कराल तेवढे लवकर सुज्ञ व्हाल आणि आयुष्याचा गुंता सुटून आयुष्य सोपे होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *