महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम, गोविंदा रे गोपाळा. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. गोविंदा पथके उंचच उंच मनोरे रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थरांचा अभूतपूर्व मनोरा रचत नवा विश्वविक्रम रचला आहे.
ठाण्यातील वर्तकनगर भागात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहींहडी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळपासूनच मुंबई, ठाणे परिसरातील विविध गोविंदा पथकाने ९ थर रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारीच जोगेश्वरी येथील कोकण नगर पथकानं तब्बल १० थर रचून विश्वविक्रम रचला.
कोकण नगर गोविंदा पथकाबाबत माहिती
विश्वविक्रम रचणारे पथक जोगेश्वरी येथील कोकण भागातील असल्याची माहिती आहे. विवेक कोचरेकर हे या पथकाचे प्रशिक्षक आहेत. गेल्या १२ वर्षांपासून हे पथक कार्यरत असून, आपल्या शिस्तपद्धतीसाठी ओळखले जातात.
आज त्यांनी १० थर रचून विश्वविक्रम रचला. २०१२ साली ७ थर लावण्यास सुरूवात केली होती. नंतर आठ थर लावले. २०१५ साली जय जवान, ताडवाडी गोविंदा पथकाने नऊ थर लावले. आता कोकण नगर गोविंदा पथकानेही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने १० थर रचून विश्वविक्रम रचला.