महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट ।। पुण्यात चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २१) दिवसभर ढगाळ वातावरण आणि ऊन असा लपंडाव सुरू होता. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. शहरामध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले होते.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरली आणि विसर्ग सुरू झाल्याने ओढ्या-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, मागील २४ तासांत पावसाचा जोर ओसरला आणि दिवसभर उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी तुरळक ठिकाणी पावसाची अतिहलक्या सरी पडल्या. दुपारनंतर हवामान कोरडे होते, तर कमाल तापमानातही दोन ते तीन अंशाने वाढ झाली.
गुरुवारी सायंकाळपर्यंत पुरंदर परिसरात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गिरीवन येथे १० मिलिमीटर, पाषाण परिसरात तीन मिलिमीटर, शिवाजीनगर येथे दोन मिलिमीटर, तर हडपसर आणि चिंचवड परिसरात एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरासह जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज
पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल. पावसाच्या अतिहलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.