महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट ।। पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर आज सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचा प्रवास खडतर ठरला. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना तास न् तास अडकून पडावे लागले. या कोंडीमुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळेदेखील वाहतूक विस्कळित झाली. गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता तसेच पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहराच्या मध्य भागातही पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली होती. रात्री आठ वाजेपर्यंत रस्त्यावरची कोंडी कायम राहिल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात, वाहतूक कोंडी होते, याची जाणीव असूनही महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून ठोस नियोजन होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.