ChatGPT चं मोठं पाऊल; OpenAI चे भारतातील पहिले कार्यालय नवी दिल्लीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट ।। ‘चॅटजीपीटी’ची (ChatGPT) मूळ कंपनी ‘ओपनएआय’ (OpenAI) या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आपले पहिले कार्यालय नवी दिल्लीत सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने कर्मचारी भरती सुरू केली आहे. वापरकर्त्यांच्या संख्येनुसार भारत ही ओपनएआयसाठी दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असून, या निर्णयामुळे कंपनी भारतातील आपले स्थान अधिक मजबूत करत आहे.

मायक्रोसॉफ्टच्या पाठबळाने स्थापन झालेल्या ओपनएआय ने भारतात आपली कायदेशीर संस्था नोंदवली असून स्थानिक टीमची भरती सुरू केली असल्याची माहिती कंपनीने दिली. भारतात जवळपास एक अब्ज इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यांना लक्ष्य करत ओपनएआयने याच आठवड्यात ४.६० डॉलरचा (अंदाजे ३८५ रुपये) सर्वात स्वस्त मासिक प्लॅन भारतात सादर केला होता. त्यामुळे भारताला एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून पाहिले जात आहे.

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन काय म्हणाले?
एकीकडे विस्तार करत असताना ओपनएआयला भारतात कायदेशीर आव्हानांनाही सामोरे जावे लागत आहे. अनेक वृत्तसंस्था आणि पुस्तक प्रकाशकांनी चॅटजीपीटीला प्रशिक्षित करण्यासाठी आपला मजकूर परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप केला आहे. तथापि, कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “भारतात आमचे पहिले कार्यालय उघडणे आणि स्थानिक टीम तयार करणे, हे प्रगत एआय (AI) देशभरात अधिक सुलभ बनवण्याच्या आणि ‘भारतासाठी व भारतासोबत एआय’ तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वाचे पहिले पाऊल आहे.”

तीव्र स्पर्धेला जावे लागणार सामोरे
भारतात ओपनएआयला गुगलचे जेमिनी (Gemini) आणि एआय स्टार्टअप पर्प्लेक्सिटी (Perplexity) यांसारख्या प्रतिस्पर्धकांकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतातील अनेक वापरकर्त्यांसाठी त्यांचे प्रगत प्लॅन्स विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. शुक्रवारी जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, चॅटजीपीटी वापरणाऱ्यांमध्ये भारतात विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच, गेल्या वर्षभरात येथील साप्ताहिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या चौपट झाली आहे, असेही ओपनएआयने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *