महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। गणेशोत्सव आणि वाहतूक कोंडी हे पुणेकरांसाठी एक समीकरण झाले आहे. मात्र अद्याप गणेशोत्सव सुरू होत नाही तेच पुणेकरांना मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
उत्सवाच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक बाजारपेठांत आल्याने वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यात गणेश मंडळांच्या मांडवांची उभारणी, विविध वस्तुंची विक्री करणाऱ्या दुकानांचे रस्त्यांवर झालेले अतिक्रमणे आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी बऱ्याच ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून पार्क केलेली वाहने यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (एफसी रस्ता), जंगली महाराज रस्ता तसेच या मार्गांना जोडणारे अनेक रस्ते वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाले आहेत. सकाळपासूनच या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांना तसेच चारचाकी वाहनधारकांना अर्धा किलोमीटरच्या अंतरासाठीसुद्धा २० ते २५ मिनिटांचा वेळ लागत आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. काही ठिकाणी एकतर्फी वाहतूक सुरू करण्यात आली असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील वाहनांची वाढलेली संख्या आणि मंडवांमुळे रस्त्यांची घटलेली रुंदी यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
गणेशोत्सवाच्या तयारीनिमित्त शहरातील बाजारपेठांत उत्साह असला तरी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. आगामी काही दिवसांत खरेदीसह गणेश मंडपाच्या उभारणीचा वेग अधिक वाढणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुटीमुळे कोंडीत वाढ –
विशेषतः शनिवारचा सुटीचा दिवस आणि त्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये वाढलेली खरेदी यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. कोंडीची परिस्थिती केवळ शहरापुरती मर्यादित नमूद उपनगरांमधील बाजारपेठांत देखील कोंडी झाली आहे.