महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असून, ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण, घाटमाथा तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज कोकणात विशेषत: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह उपनगरात पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. हा पाऊस पुढील काही दिवस असाच सुरु राहणार आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात, असे संकेत मिळाले आहेत.
विदर्भात मात्र हवामान तुलनेने स्थिर असून, अंशतः ढगाळ वातावरणासोबत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला परिसरात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरींचा अनुभव येऊ शकतो. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर काही ठिकाणी तापमानात चढउतार होत असल्याने आर्द्रतेमुळे उकाडाही जाणवत आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश व त्याच्या शेजारील भागावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ते वायव्येकडे सरकत आहे. या प्रणालीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, जयपूर, ग्वालियर, प्रयागराज, कमी दाबाचे केंद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. यामुळे राज्यात वातावरण अस्थिर बनले असून, ढगांचा उच्छाद कायम आहे. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविली आहे. याचा सरळ परिणाम पुन्हा महाराष्ट्रातील मान्सूनच्या सक्रियतेवर होऊ शकतो.
मुंबईसह उपनगरातही रिमझिम पावसाची सर सुरू झाली असून, अधूनमधून ढगाळ हवामानासोबत आर्द्रतेमुळे दमट वातावरण निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने फारसा जोर धरला नसला, तरी आज व पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईच्या हवामानातही बदल जाणवू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने जलस्रोतांच्या पातळीत वाढ होण्याचीही चिन्हे आहेत. म्हणजेच, कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात आज व पुढील काही दिवसांत मुसळधार सरींची शक्यता आहे.