महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। बेकायदा स्पर्म व्हेल या माशाच्या उलटीची तस्करी करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी वन विभागाकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात व्हेल माशाची दोन किलो उलटी जप्त करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत तब्बल दोन कोटी रुपये एवढी आहे. या उलटीपासून महागडे अत्तर तयार केले जाते.
पुणे वन विभागाला 21 ऑगस्ट रोजी व्हेल माशाची तस्करी करणारे आरोपी हे कोथरूड परिसरातील चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वनअधिकारी अमोल थोरात यांंच्या मार्गदर्शनाखाली पुणे वन विभागाचे वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या पथकाने चांदणी चौकात चार संशयितांना ताब्यात घेतले.
स्पर्म व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग काय?
स्पर्म व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग प्रामुख्याने महागडे अत्तर तयार करण्यासाठी केला जातो. जास्त काळ टिकणारा सुगंध तयार करण्यासाठी याचा वापर होतो.
तीन जणांची पोलिस कोठडीत रवानगी
या वेळी आरोपींकडून स्पर्म व्हेल माशाची दोन किलो उलटी जप्त करण्यात आली. इनोव्हा कारमधून ही उलटी पुण्यात आणली जात होती. याच कारवाईदरम्यान एक आरोपी फरार झाला. या प्रकरणात स्पर्म व्हेल माशाची उलटी बाळगल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.